मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज; तालुक्यात‘अपडेट’ची धडाकेबाज मोहीम…
पाचगणी, : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे (SIR) अभियान महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात युद्धपातळीवर सुरू असून, आज गोडवली गावात या अभियानांतर्गत मतदारांची माहिती पडताळणी व अद्ययावतीकरणाचे काम करण्यात आले. गोडवली गावातील सर्व मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व संबंधित कर्मचारी घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती, पत्ता आणि नोंदींची पडताळणी करीत आहेत. मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नावे अचूकपणे नोंदविणे तसेच दुबार अथवा स्थलांतरित मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यावर या अभियानात भर देण्यात येत आहे.
महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून, नायब तहसीलदार विनोद सावंत,निवडणूक नायब तहसिलदार जहिदा शेख,पर्यवेक्षक अधिकारी दिपक बोर्डे, मंडळाधिकारी विजय खरात, तलाठी सुदाम मामलीवाड, तलाठी अजय रसाळ, बीएलओ सुषमा मालुसरे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, महसूल कर्मचारी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, संकलन पथक आणि आयटी टीम समन्वयाने काम करीत आहेत.
यावेळी नायब तहसीलदार विनोद सावंत यांनी सांगितले की, ३ ते ८ ऑगस्टदरम्यान अनकलेक्टेबल फॉर्मची फेरपडताळणी, मॅपिंग न झालेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे, त्रुटी दूर करणे तसेच डिजिटाइज झालेल्या नोंदींची पुढील टप्प्यात तपासणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानाला नागरिकांकडूनही सहकार्य मिळत असून, मतदारांनी घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत पडताळणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.