पाचगणी, : राज्यातील पेपरफुटी प्रकरणांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाचगणीत बुधवारी सर्वपक्षीय संघटना, युवक, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पाचगणी बसस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हातात तिरंगी ध्वज, न्यायाच्या मागणीचे फलक आणि काळ्या फिती बांधून विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, “पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सहभागी नागरिकांनी पेपरफुटीच्या घटनांचा तीव्र निषेध नोंदवत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात संताप व्यक्त केला.
रॅलीदरम्यान पेपरफुटी प्रकरणांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी शासनाने पेपरफुटी प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विश्वास अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या निषेध रॅलीतून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी पाचगणीकरांनी एकजुटीने बुलंद आवाज उठविला.