उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानगंगा हायस्कूलची दैदिप्यमान कामगिरी.. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब…
पंचगणी, : ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. या परीक्षेत मरियम असिफ पटेल आणि अथर्व किरण भिलारे यांनी उज्ज्वल यश मिळवून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात असून, नियमित अध्यापनासोबतच विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि विशेष प्रशिक्षण दिले जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे यश असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि व्यवस्थापनाने यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शाळेचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे ज्ञानगंगा हायस्कूलने परिसरात वेगळी ओळख निर्माण केली असून, शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.