गोडवली येथे शेत जमिनीचे भूस्खलन; तपनेश्वर मंदिराशेजारील शेतजमीन पुन्हा खचली…
पाचगणी,दि.३१ : पाचगणी परिसरात गेली आठ दिवसांपासून सुरु असणार्या धुवाधार पावसामुळे पाचगणी शहरानजीक नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की गोडवली हे पांचगणी शहरा नजीक टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे.या आगोदरही दोन तीन वेळा याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यावर उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. जमिनीला भेगा पडून ती खचत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्याचे नुकसान झाले आहे. राहिलेली शेतीही भूस्खलनात जाते की काय, अशी भीती या जमीन मालकामध्ये निर्माण झाली आहे. गेल्या १२ ते १५ वर्षा पुर्वी याच ठिकाणी जमीन खचली होती. त्यावेळी अधिकार्यांनी पाहणी केली होती. परंतु जमिन खचण्याच्या प्रकाराची भौैगोलिक तज्ज्ञांकडून पाहणी करायला हवी होती. मात्र, अद्याप यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ही जमीन खचू लागली आहे. शेतीमध्ये सुमारे १०० फूट लांबीची व तीन ते चार फूट उंचीची भेग पडली असून जमीन खचली आहे.
गोडवलीतील सतीश रघुनाथ गुरव या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.